auto add

Saturday, July 1, 2017

पसायदान

पसायदान


।। पसायदान ।।
आता विश्र्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें । 
तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ।।

जे खळांची व्यंकटी सांडो ।तया  सत्कर्मी रती वाढो ।
भूतां परस्परें पडो। मैत्र जीवांचें ।।
दुरिताचें तिमिर जावो । विश्र्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जें वांछील तो तें लाहो । प्राणिजात।।
वर्षत सकळ मंगळीं । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु या भूतां ।।
चला कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणीचें गांव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ।।
चंद्रमे जे अलांछन। मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ।।
किंबहुना सर्व सुखीं । पूर्ण होउनि तिहीं लोकीं ।
भजिजो आदीपुरुखी । अखंडित ।।
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं ईयें ।
दृष्टा दृष्ट विजयें । होआवें जी ।।
तेथ म्हणे श्रीविश्र्वेशरावो । हा होईल दानपसावो ।
येणेंवरें ज्ञांनदेवो । सुखिया जाला ।।

*****


मित्रहो सस्नेह राम कृष्ण हरी,
 महाराष्ट्र हि संतांची भूमी. त्यात संत ज्ञानेश्वर संत तुकाराम , संत एकनाथ, संत नामदेव, संत निवृत्ती नाथ, संत सावतामाळी, संत गोरा कुंभार, जनाई, मुक्ताई संत सखुबाई अश्या अनेक संतांचा समावेश आहे. या संतांनी आयुष्य जगण्यासाठी लागणारी मुल्ये विचारआचार चांगुलपणा सामाजिक बांधिलकी याचे संस्कार आपल्या मराठीला मातीला दिले.

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी जगाच्या ऊदधारासाठी, प्राणिमात्राच्या ऊदधारासाठी,  मराठी मातीच्या ऊदधारासाठी, नव्हे नव्हे  मराठी भाषेच्या ऊदधारासाठी  मुळ संस्कृतमधुन असलेल्या हिंदु धर्माचा सर्वोच्च ग्रंथ भागवत गितेचे मराठी भाषेत रुपांतर करीत  "ज्ञानेश्वरी" ला जन्म दिला. आणि या "ज्ञानेश्वरी" उर्फ "भावार्थ दीपिका" या ग्रंथातील अठराव्या अध्यायाच्या शेवटी हि वांग्मयरुपी सेवा देवाला अर्पण करून या वांग्मयरुपी सेवेचे फळ म्हणून त्यांनी देवाकडे संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी प्रसादरुपी पसायदान  मागितले. यात त्यांनी स्वतसाठी असे काहीही मागीतले नाही परंतु प्रेत्येक जिवित चिजवस्तु प्राणिमात्रासाठी  संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी देवाकडे दान - एक प्रकारे साकडेच घातले हे पसायदान आपणा सर्वांना माहित आहेच परंतु त्याचा अर्थ सोप्या भाषेत लिहिण्याचा व नव्या पिढीला आपल्या मराठी मातीच्या संस्कारांशी जोडण्याचा हा छोटासा प्रयत्न.
  
आता विश्र्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें । 
तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ।।
पसायदानला सुरुवात करताना माऊली म्हणतात, देवा हि जी माझी वांग्मयरुपी सेवा आहे, तीचा तु स्विकार कर आणि या वांग्मयरुपी सेवेचे फळ म्हणून तु मला प्रसादरुपी दान दे.

जे खळांची व्यंकटी सांडो ।तया  सत्कर्मी रती वाढो । 
भूतां परस्परें पडो। मैत्र जीवांचें ।।
सर्वप्रथम या पसायदानात माऊली मागतात कि, जे वाईट दुष्ट लोक आहेत त्यांचा दुष्टपणा संपून जाऊन त्यांनी चांगल्या मार्गाला लागावे. आणि सर्व माणसे चांगल्या मार्गाला लागल्यानंतर त्यांच्यामध्ये मैत्रीचे भावबंध निर्माण व्हावे .

दुरिताचें तिमिर जावो । विश्र्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जें वांछील तो तें लाहो । प्राणिजात।।

माऊली मागतात कि वाईट लोकांच्या जीवनातला अंधार दूर होऊन सर्व विश्वात स्वधर्म रुपी सूर्याचा उदय होवो. आणि सर्व प्राणिमात्रांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत . ते जे मागतील ते सर्व त्यांना मिळो.

वर्षत सकळ मंगळीं । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु या भूतां ।।

माऊली म्हणतात कि सर्व ईश्वरनिष्ठ असलेल्या लोकांनी, संतांनी इथल्या भूमीवर मंगलमय वातावरण निर्माण करण्यासाठी एकत्र यावे व सर्व प्राणीमात्रांना भेटावे .

चला कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणीचें गांव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ।।
ईथे माऊली संतांच वर्णन असं करतात कि ते संत म्हणजे कल्पतारुंचे उद्याने चेतना रूपी वातावरण निर्माण करणारे रत्न आणि ज्यांचे  बोल हे अमृताप्रमाणे आहेत असेच आहेत . 

 
चंद्रमे जे अलांछन। मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ।।

माऊली म्हणतात हे संत म्हणजे कोणताही डाग नसलेले चंद्र आहेत ताप नसलेले सुर्य आहेत व  ते सर्व सज्जनांचे मित्र आहेत .


किंबहुना सर्व सुखीं । पूर्ण होउनि तिहीं लोकीं ।
भजिजो आदीपुरुखी । अखंडित ।।

माऊली म्हणतात या पृथ्वीवरील सर्व लोकांनी सर्वतोपरी सुखी होऊन विश्वेवराची अखंडित सेवा करत राहावी .


आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं ईयें ।
दृष्टा दृष्ट विजयें । होआवें जी ।।

माऊली म्हणतात या "ज्ञानेश्वरी" ग्रंथालाच जीवन मानून सर्व दुष्ट प्रवृतींवर विजय मिळवून सुखी व्हावे .

तेथ म्हणे श्रीविश्र्वेशरावो । हा होईल दानपसावो ।
येणेंवरें ज्ञांनदेवो । सुखिया जाला ।।

पसायदानाच्या शेवटी माऊली म्हणतात विश्वेश्वारांनी प्रसन्न होऊन हा वर माऊलींना दिला व माऊली आनंदी झाले .

तर मित्रहो हा मूळ पसायदानाचा शब्दशः अर्थ नसून सोप्या भाषेतला अर्थ आहे . माऊलींनी सर्व प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी मागितलेली हि प्रार्थना खरोखरच खूप सुंदर आहे . तसा पसायदानाचा अर्थ सांगणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेण्या सारखेच आहे,  परंतु नव्या पिढीला या फेसबुक, व्हाटसप, 4G, 5G, स्मार्टफोन , आयफोन, गेलेक्सी च्या जमान्यात कुठेतरी त्यांच्या आवडत्या (ईंटरनेटच्या ) माध्यमात ऊपलब्ध असावा हिच मनोकामना व नव्या पिढीला आपल्या मराठी मातीच्या संस्कारांशी जोडण्याचा हा छोटासा प्रयत्न केला आहे. हा अर्थ आपल्याला आवडला असल्यास त्याचे सर्व श्रेय माऊली चरणी अर्पण करतोव यात काही चुका असल्यास मात्र निसंशय कऴवाव्यात.
राम कृष्ण हरी !!....
धन्यवाद!!....

No comments:

Post a Comment