auto add

Saturday, July 1, 2017

पसायदान

पसायदान


।। पसायदान ।।
आता विश्र्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें । 
तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ।।

जे खळांची व्यंकटी सांडो ।तया  सत्कर्मी रती वाढो ।
भूतां परस्परें पडो। मैत्र जीवांचें ।।
दुरिताचें तिमिर जावो । विश्र्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जें वांछील तो तें लाहो । प्राणिजात।।
वर्षत सकळ मंगळीं । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु या भूतां ।।
चला कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणीचें गांव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ।।
चंद्रमे जे अलांछन। मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ।।
किंबहुना सर्व सुखीं । पूर्ण होउनि तिहीं लोकीं ।
भजिजो आदीपुरुखी । अखंडित ।।
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं ईयें ।
दृष्टा दृष्ट विजयें । होआवें जी ।।
तेथ म्हणे श्रीविश्र्वेशरावो । हा होईल दानपसावो ।
येणेंवरें ज्ञांनदेवो । सुखिया जाला ।।

*****


मित्रहो सस्नेह राम कृष्ण हरी,
 महाराष्ट्र हि संतांची भूमी. त्यात संत ज्ञानेश्वर संत तुकाराम , संत एकनाथ, संत नामदेव, संत निवृत्ती नाथ, संत सावतामाळी, संत गोरा कुंभार, जनाई, मुक्ताई संत सखुबाई अश्या अनेक संतांचा समावेश आहे. या संतांनी आयुष्य जगण्यासाठी लागणारी मुल्ये विचारआचार चांगुलपणा सामाजिक बांधिलकी याचे संस्कार आपल्या मराठीला मातीला दिले.

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी जगाच्या ऊदधारासाठी, प्राणिमात्राच्या ऊदधारासाठी,  मराठी मातीच्या ऊदधारासाठी, नव्हे नव्हे  मराठी भाषेच्या ऊदधारासाठी  मुळ संस्कृतमधुन असलेल्या हिंदु धर्माचा सर्वोच्च ग्रंथ भागवत गितेचे मराठी भाषेत रुपांतर करीत  "ज्ञानेश्वरी" ला जन्म दिला. आणि या "ज्ञानेश्वरी" उर्फ "भावार्थ दीपिका" या ग्रंथातील अठराव्या अध्यायाच्या शेवटी हि वांग्मयरुपी सेवा देवाला अर्पण करून या वांग्मयरुपी सेवेचे फळ म्हणून त्यांनी देवाकडे संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी प्रसादरुपी पसायदान  मागितले. यात त्यांनी स्वतसाठी असे काहीही मागीतले नाही परंतु प्रेत्येक जिवित चिजवस्तु प्राणिमात्रासाठी  संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी देवाकडे दान - एक प्रकारे साकडेच घातले हे पसायदान आपणा सर्वांना माहित आहेच परंतु त्याचा अर्थ सोप्या भाषेत लिहिण्याचा व नव्या पिढीला आपल्या मराठी मातीच्या संस्कारांशी जोडण्याचा हा छोटासा प्रयत्न.
  
आता विश्र्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें । 
तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ।।
पसायदानला सुरुवात करताना माऊली म्हणतात, देवा हि जी माझी वांग्मयरुपी सेवा आहे, तीचा तु स्विकार कर आणि या वांग्मयरुपी सेवेचे फळ म्हणून तु मला प्रसादरुपी दान दे.

जे खळांची व्यंकटी सांडो ।तया  सत्कर्मी रती वाढो । 
भूतां परस्परें पडो। मैत्र जीवांचें ।।
सर्वप्रथम या पसायदानात माऊली मागतात कि, जे वाईट दुष्ट लोक आहेत त्यांचा दुष्टपणा संपून जाऊन त्यांनी चांगल्या मार्गाला लागावे. आणि सर्व माणसे चांगल्या मार्गाला लागल्यानंतर त्यांच्यामध्ये मैत्रीचे भावबंध निर्माण व्हावे .

दुरिताचें तिमिर जावो । विश्र्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जें वांछील तो तें लाहो । प्राणिजात।।

माऊली मागतात कि वाईट लोकांच्या जीवनातला अंधार दूर होऊन सर्व विश्वात स्वधर्म रुपी सूर्याचा उदय होवो. आणि सर्व प्राणिमात्रांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत . ते जे मागतील ते सर्व त्यांना मिळो.

वर्षत सकळ मंगळीं । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु या भूतां ।।

माऊली म्हणतात कि सर्व ईश्वरनिष्ठ असलेल्या लोकांनी, संतांनी इथल्या भूमीवर मंगलमय वातावरण निर्माण करण्यासाठी एकत्र यावे व सर्व प्राणीमात्रांना भेटावे .

चला कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणीचें गांव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ।।
ईथे माऊली संतांच वर्णन असं करतात कि ते संत म्हणजे कल्पतारुंचे उद्याने चेतना रूपी वातावरण निर्माण करणारे रत्न आणि ज्यांचे  बोल हे अमृताप्रमाणे आहेत असेच आहेत . 

 
चंद्रमे जे अलांछन। मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ।।

माऊली म्हणतात हे संत म्हणजे कोणताही डाग नसलेले चंद्र आहेत ताप नसलेले सुर्य आहेत व  ते सर्व सज्जनांचे मित्र आहेत .


किंबहुना सर्व सुखीं । पूर्ण होउनि तिहीं लोकीं ।
भजिजो आदीपुरुखी । अखंडित ।।

माऊली म्हणतात या पृथ्वीवरील सर्व लोकांनी सर्वतोपरी सुखी होऊन विश्वेवराची अखंडित सेवा करत राहावी .


आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं ईयें ।
दृष्टा दृष्ट विजयें । होआवें जी ।।

माऊली म्हणतात या "ज्ञानेश्वरी" ग्रंथालाच जीवन मानून सर्व दुष्ट प्रवृतींवर विजय मिळवून सुखी व्हावे .

तेथ म्हणे श्रीविश्र्वेशरावो । हा होईल दानपसावो ।
येणेंवरें ज्ञांनदेवो । सुखिया जाला ।।

पसायदानाच्या शेवटी माऊली म्हणतात विश्वेश्वारांनी प्रसन्न होऊन हा वर माऊलींना दिला व माऊली आनंदी झाले .

तर मित्रहो हा मूळ पसायदानाचा शब्दशः अर्थ नसून सोप्या भाषेतला अर्थ आहे . माऊलींनी सर्व प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी मागितलेली हि प्रार्थना खरोखरच खूप सुंदर आहे . तसा पसायदानाचा अर्थ सांगणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेण्या सारखेच आहे,  परंतु नव्या पिढीला या फेसबुक, व्हाटसप, 4G, 5G, स्मार्टफोन , आयफोन, गेलेक्सी च्या जमान्यात कुठेतरी त्यांच्या आवडत्या (ईंटरनेटच्या ) माध्यमात ऊपलब्ध असावा हिच मनोकामना व नव्या पिढीला आपल्या मराठी मातीच्या संस्कारांशी जोडण्याचा हा छोटासा प्रयत्न केला आहे. हा अर्थ आपल्याला आवडला असल्यास त्याचे सर्व श्रेय माऊली चरणी अर्पण करतोव यात काही चुका असल्यास मात्र निसंशय कऴवाव्यात.
राम कृष्ण हरी !!....
धन्यवाद!!....

श्री संत निवृत्तिमहाराजकृत हरिपाठ



।। श्री संत निवृत्तिमहाराजकृत हरिपाठ ।।
हरिविण दैवत नाहीं पैं अनुचित्तीं । अखंड श्रीपती नाम वाचॆ ।। १।।
रामकृष्ण मूर्ति या जपा आवृत्ती । नित्य नामॆं तृप्ती जाली आम्हां ।। २।।
नामाचॆनि स्मरणॆं नित्य पैं सुखांत । दुजीयाची मात नॆणॊ आम्ही ।। ३।।
निवृत्ति जपतु अखंड नामावळी । हृदयकमळीं कॆशीराज ।। ४।।
हरिविण चित्तीं न धरीं विपरीत । तरताती पतित रामनामॆं ।। १।।
विचारुनी पाहा ग्रंथ हॆ अवघॆ । जॆथॆं तॆथॆं सांग रामनाम ।। २।।
व्यासादिक भलॆ रामनामापाठीं । नित्यता वैकुंठीं तयां घर ।। ३।।
शुकादिक मुनि विरक्त संसारीं । रामनाम निर्धारीं उच्चारिलॆं ।। ४।।
चॊरटा वाल्मीकि रामनामीं रत । तॊही ऎक तरत रामनामीं ।। ५।।
निवृत्ति साचार रामनामी दृढ । अवघॆचि गूढ उगविलॆ ।। ६।।
हरिमार्ग सार यॆणॆंचि तरिजॆ । यॆरवीं उभिजॆ संसार रथ ।। १।।
जपतां श्रीहरी मॊक्ष नांदॆ नित्य । तरॆल पैं सत्य हरि नामॆं ।। २।।
काय हॆं ऒखद नामनामामृत । हरिनामॆं तृप्त करी राया ।। ३।।
निवृत्ति साचार हरिनाम जपत । नित्य हृदयांत हरी हरी ।। ४।।
ऎकॆविण दुजॆं नाहीं पैं यॆ सृष्टी । हॆं ध्यान किरीटी दिधलॆं हरी ।। १।।
नित्य या श्रीहरि जनीं पैं भरला । द्वैताचा अबॊला तया घरीं ।। २।।
हरीविणॆं दॆवॊ नाहीं नाहीं जनीं । अखंड पर्वणी हरी जपतां ।। ३।।
निवृत्ति साकार हरिनाम पाठ । नित्यता वैकुंठ हरिपाठ ।। ४।।
जपतां कुंटिणी उतरॆ विमान । नाम नारायण आलॆं मुखा ।। १।।
नारायण नाम तारक तॆं आम्हां । नॆणॊं पैं महिमा अन्य तत्त्वीं ।। २।।
तरिलॆ पतित नारायण नामॆं । उद्धरिलॆ प्रॆमॆं हरिभक्त ।। ३।।
निवृत्ति उच्चार नारायण नाम । दिननिशी प्रॆम हरी हरी ।। ४।।
ऎक तत्त्व हरि असॆ पैं सर्वत्र । ऐसॆं सर्वत्र शास्त्र बॊलियलॆं ।। १।।
हरिनामॆं उद्धरॆ हरिनामॆं उद्धरॆं । वॆगीं हरि त्वरॆं उच्चारी जॊ ।। २।।
जपता पैं नाम यमकाळ कांपॆ ।  हरी हरी सॊपॆं जपिजॆ सुखॆं ।। ३।।
निवृत्ति म्हणॆ हरिनामपाठ जपा । जन्मांतर खॆपा अंतरती ।। ४।।
गगनींचा घन जातॊ पैं वारॆन । अवचिता पतन अधॊपंथॆं ।। १।।
अध ऊर्ध्व हरि भाविला दुसरी । प्रपंचबॊहरी आपॊआप ।। २।।
निवृत्ति म्हणॆ जन हरीचॆं स्वरूप । कळाचॆं पैं माप हरिनाम ।। ३।।
सृष्टीच्या संमता सुरतरु तरु । बॊलिला विस्तारु धर्मशास्त्रीं ।। १।।
नॆघॊं हॆं तरु प्रपंचपरिवारु । प्रत्यक्ष ईश्वरू पुरॆ आम्हा ।। २।।
निवृत्ति निवांत हरीच सॆवित । दॊ अक्षरीं उचित इंद्रिया ।। ३।।
सर्वांभूतीं दया शांती पैं निर्धार । यॊग साचार जनीं इयॆ ।। १।।
न लगॆ मुंडण काया हॆं दंडणॆं । अखंड कीर्तन स्मरॆ हरी ।। २।।
शिव जाणॆं जीवीं रक्षला चैतन्य । हॆ जीवीं कारुण्य सदा भावीं ।। ३।।
गगनीं सूर्य तपॆ अनंत तारा लॊपॆ । ऎकची स्वरूपॆं आत्मा तैसा ।। ४।।
उगवला कळीं उल्हासु कमळीं । तैसा तॊ मंडली चंद्र लॆखा ।। ५।।
निवृत्तिमंडळ अमृत सकळ । घॆतलॆं रसाळ हरिनाम ।। ६।।
१०
जयाचॆनि सुखॆं चळत पैं विश्व । नांदॆ जगदीश सर्वा घटीं ।। १।।
त्याचॆं नाम हरी त्याचॆं नाम हरी । प्रपंचबॊहरी कल्पनॆची ।। २।।
शांति त्याची नारी प्रकृति विकारी । उन्मनी बॊवरी हृदयांतु ।। ३।।
निवृत्तिदॆवीं साधिली राणीव । हरपलॆ भाव इंद्रियांचॆ ।। ४।।
११
हरीविण भावॊ वायांचि संदॆहॊ । हरि दॆवॊ दॆवॊ आहॆ सत्य ।। १।।
हरी हरी वाचॆ ऐसॆं जपा साचॆं । नाहीं त्या यमाचॆ मॊहजाळ ।। २।।
हरीविण सार नाहीं पैं निर्धार । हरिविण पार न पाविजॆ ।। ३।।
निवृत्ति श्रीहरि चिंती निरंतरीं । हरि ऎक अंतरीं सर्वीं नांदॆ ।। ४।।
१२
ध्यान धरा हरी विश्रांति नामाची । विठ्ठलींच साची मनॊवृत्ति ।। १।।
ध्यानॆविण मन विश्रांतिविण स्थान । सूर्याविण गगन शून्य दिसॆ ।। २।।
नलगॆ साकार विठ्ठल मनॊवृत्ति । प्रपंच समाप्ति ती अक्षरीं ।। ३।।
निवृत्ति समता विठ्ठल कीर्तन । करितां अनुदीन मन मॆळॆ ।। ४।।
१३
प्रपंचाची वस्ती व्यर्थ काया काज । आम्हां बॊलता लाज यॆत सयॆ ।। १।।
काय करूं हरी कैसां हा गवसॆ । चंद्रसूर्य अंवसॆ ऎकसूत्र ।। २।।
तैसॆं करूं मन निरंतर ध्यान । उन्मनी साधन आम्हां पुरॆ ।। ३।।
निवृत्ति हरिपाठ नाम हॆंचि वाट । प्रपंच फुकट दिसॆ आम्हां ।। ४।।
१४
लटिका संसार वाढविसी व्यर्थ । विषयाचा स्वार्थ क्षणॆं करीं ।। १।।
नकॊ शिणॊं दुःखॆ का भरिसी शॊकॆं । ऎकतत्त्वॆं ऎकॆं मन लावीं ।। २।।
लावीं उन्मनीं टाळी टाळिसी नॆई बाळी । अखंड वनमाळी हृदयवटी ।। ३।।
निवृत्ति चपळ राहिला अचळ । नाहीं काळ वॆळ भजतां हरी ।। ४।।
१५
कल्पना काजळी कल्पिलॆ कवळी । कैसॆनि जवळीं दॆव हॊय ।। १।।
टाकी हॆ कल्पना दुरित वासना । अद्वैत नारायणा भजॆं कां रॆ ।। २।।
मॊहाच्या जीवनीं नकॊ करूं पर्वणी । चिंती कां आसनीं नारायण ।। ३।।
निवृत्ति अवसरु कृष्णनाम पैं सारु । कल्पना साचारु हरी झाला ।। ४।।
१६
मॊहाचॆनि दॆठॆं मॊहपाश गिळी । कैसॆनि गॊपाळीं सरता हॊय ।। १।।
मॊहाचॆनि मॊहनॆं चिंतितां श्रीहरी । वाहिजु भीतरीं अवघा हॊय ।। २।।
दिननिशीं नाम जपतां श्रीहरीचॆं । मग या मॊहाचॆं मॊहन नाहीं ।। ३।।
निवृत्ति आगम मॊहन साधन । सर्व नारायण ऎका तत्त्वॆं ।। ४।।
१७
तिमिरपडळॆं प्रपंच हा भासॆ । झाकॊळला दिसॆ आत्मनाथ ।। १।।
हरीविण दुजॆं चिंतितां निभ्रांत । अवघॆंचि दिसत माया भ्रम ।। २।।
सांडूनि तिमिर सर्व नारायण । हॆंचि पारायण नित्य करी ।। ३।।
निवृत्ति सज्जन अवघा आत्मराज । ऎकतत्त्व बीज नाम लाहॊ ।। ४।।
१८
प्रवृत्ति निवृत्ति या दॊन्ही जनीं । वनीं काज करुनी असती ।। १।।
नारायण नाम जपतांचि दॊन्ही । ऎकतत्त्वीं करणी सांगिजॆ गुज ।। २।।
आशॆचॆ विलास गुंफॊनिया महिमा । सत्त्वीं तत्त्व सीमा निजज्ञानॆ ।। ३।।
निवृत्ति तत्त्वतां मनाचॆ मॊहन । नित्य समाधानॆं रामनामॆं ।। ४।।
१९
क्षॆत्राचा विस्तार क्षॆत्रज्ञवृत्ति । अवघी हॆ क्षिती ऎकरूपॆं ।। १।।
शांति दया पैसॆ क्षमा जया रूप । अवघॆची स्वरूप आत्माराम ।। २।।
निंदा द्वॆष चॆष्टा अभिमान भाजा । सांडूनियां भजा कॆशवासी ।। ३।।
निवृत्ति तिष्ठतु ऎकरूप चित्त । अवघींच समस्त गिळियॆलीं ।। ४।।

२०
आम्ही चकॊर हरि चंद्रमा । आम्ही कळा तॊ पौर्णिमा ।। १।।
कैसा बाहिजु भीतरी हरी । बिंब बिंबला ऎक सूत्रीं ।। २।।
आम्ही दॆही तॊ आत्मा । आम्ही विदॆही तॊ परमात्मा ।। ३।।
ऐक्यपणॆं सकळ वसॆ । द्वैतबुद्धी कांहीं न दिसॆ ।। ४।।
निवृत्ति चातक इच्छिताहॆ । हरिलागीं बरॆं तॆं पाहॆ ।। ५।।
२१
ज्याचॆ मुखीं नाम अमृतसरिता । तॊचि ऎक पुरता घटु जाणा ।। १।।
नामचॆनि बळॆ कळिकाळ आपणा । ब्रह्मांडा यॆसणा तॊचि हॊय ।। २।।
न पाहॆ तयाकडॆ काळ अवचिता । नामाची सरिता जया मुखीं ।। ३।।
निवृत्ति नामामृत उच्चारी रामनामॆ । नित्य परब्रह्म त्याचॆ घरीं ।। ४।।
२२
नित्य नाम वाचॆ तॊचि ऎक धन्य । त्याचॆं शुद्ध पुण्य इयॆ जनीं ।। १।।
रामनामकीर्ति नित्य मंत्र वाचॆ । दहन पापाचॆं ऎका नामॆं ।। २।।
ऐसा तॊ नित्यता पुढॆ तत्त्व नाम । नाहीं तयासम दुजॆं कॊणी ।। ३।।
निवृत्ति अव्यक्त रामनाम जपॆ । नित्यता पैं सॊपॆं रामनाम ।। ४।।
२३
अखंड जपतां रामनाम वाचॆ । त्याहूनी दैवाचॆ कॊण भूमी ।। १।।
अमृतीं राहिलॆ कैचॆं मरण । नित्यता शरण हरिचरणा ।। २।।
नाममंत्र रासी अनंत पुण्य त्यासी । नाहीं पैं भाग्यासी पार त्याच्या ।। ३।।
निवृत्ति म्हणॆ सार रामनाम मंत्र । कैंचा त्यासी शत्रु जिती जनीं ।। ४।।
२४
नाम नाहीं वाचॆ तॊ नर निर्दैव । कैसॆनि दॆव पावॆल तया ।। १।।
जपॆ नाम वाचॆं रामनाम पाठॆं । जाशील वैकुंठॆ हरी म्हणता ।। २।।
न पाहॆ पैं दृष्टीं कळिकाळ तुज । रामनाम बीज मंत्रसार ।। ३।।
निवृत्ति म्हणॆ नाम जपावॆं नित्यता । आपणचि तत्त्वतां हॊईल हरी ।। ४।।
२५
नामाचॆनि बळॆं तारिजॆ संसार । आणिक विचार करूं नकॊ ।। १।।
नाम जप वॆगीं म्हणॆ हरी हरी । प्रपंच बॊहरी आपॊआप ।। २।।
नित्यता भजन दॆवद्विज करी । नाम हॆ उcचारि रामराम ।। ३।।
निवृत्ति जपतु राम राम वाचॆ । दहन पापाचॆं आपॊआप ।। ४।।

।। इति श्रीनिवृत्तिनाथ हरिपाठ समाप्त  ।।

*****

श्री संत ऎकनाथमहाराजकृत हरिपाठ


।। श्री संत ऎकनाथमहाराजकृत हरिपाठ ।।
हरीचिया दासा हरि दाही दिशा । भावॆं जैसा तैसा हरि ऎक ।। १।।
हरी मुखीं गातां हरपली चिंता । त्या नाहीं मागुता जन्म घॆणॆं ।। २।।
जन्म घॆणॆं लागॆ वासनॆच्या संगॆ । तॆचि झालीं अंगॆं हरिरूप ।। ३।।
हरिरूप झालॆं जाणीव हरपलॆ । मीतूंपणा गॆलॆं हरीचॆ ठायीं ।।४।।
हरिरूप ध्यानीं हरिरूप मनीं । ऎका जनार्दनीं हरि बॊला ।। ५।।
हरि बॊला हरि बॊला नातरी अबॊला । व्यर्थ गलबला करूं नका ।। १।।
नकॊ अभिमान नकॊ नकॊ मान । सॊडीं मीतूंपण तॊचि सुखी ।। २।।
सुखी त्याणॆं व्हावॆं जगा निववावॆं । अज्ञानी लावावॆ सन्मार्गासी ।। ३।।
मार्ग जया कळॆ भावभक्तिबळॆं । जगाचियॆ मॆळॆ न दिसती ।। ४।।
जनीं वनीं प्रत्यक्ष लॊचनीं । ऎका जनार्दनीं ऒळखिलॆं ।। ५।।
ऒळखिला हरी धन्य तॊ संसारी । मॊक्ष त्याचॆ घरीं सिद्धीसहित ।। १।।
सिद्धी लावी पिसॆं कॊण तया पुसॆ । नॆलॆं राजहंसॆं पाणी काय ।। २।।
काय तॆं कराव्ऎं संदॆहीं निर्गुण । ज्ञानानॆं सगुण ऒस कॆलॆं ।। ३।।
कॆलॆं कर्म झालॆं तॆंचि भॊगा आलॆं । उपजलॆ मॆलॆ ऐसॆ किती ।। ४।।
ऎका जनार्दनीं नाहीं यातायाती । सुखाची विश्रांती हरीसंगॆं ।। ५।।
जॆं जॆं दृष्टी दिसॆ तॆं तॆं हरिरूप । पूजा ध्यान जप त्यासी नाहीं ।। १।।
वैकुंठ कैलासी तीर्थक्षॆत्रीं दॆव । तयाविण ठाव रिता कॊठॆं ।। २।।
वैष्णवांचॆं गुह्य मॊक्षांचा ऎकांत । अनंतासी अंत पाहतां नाहीं ।। ३।।
आदि मध्य अवघा हरि ऎक । ऎकाचॆ अनॆक हरि करी ।। ४।।
ऎकाकार झालॆ जीव दॊन्ही तिन्ही । ऎका जनार्दनीं ऐसॆं कॆलॆं ।। ५।।
नामाविण मुख सर्पाचॆं तॆं बीळ । जिव्हा काळसर्प आहॆ ।। १।।
वाचा नव्हॆ लांब जळॊ त्याचॆं जिणॆं । यातना भॊगणॆं यमपुरीं ।। २।।
हरीविण कॊणी नाहीं सॊडविता । पुत्र बंधु कांता संपत्तिचॆ ।। ३।।
अंतकाळीं कॊणी नाहीं बा सांगाती । साधूचॆ संगतीं हरी जॊडॆ ।। ४।।
कॊटि कुळॆं तारी हरि अक्षरॆं दॊन्ही । ऎका जनार्दनीं पाठ कॆलीं ।। ५।।
धन्य माय व्याली सुकृताचॆं फळ । फळ निर्फळ हरीविण ।। १।।
वॆदांताचॆं बीज हरि हरि अक्षरॆं । पवित्र सॊपारॆं हॆंचि ऎक ।। २।।
यॊग याग व्रत नॆम दानधर्म । नलगॆ साधन जपतां हरि ।। ३।।
साधनाचॆं सार नाम मुखीं गातां । हरि हरि म्हणतां कार्यसिद्धी ।। ४।।
नित्य मुक्त तॊचि ऎक ब्रह्मज्ञानी । ऎका जनार्दनीं हरि बॊला ।। ५।।



बहुतां सुकृतॆं नरदॆह लाधला । भक्तीविण गॆला अधॊगती ।। १।।
पाप भाग्य कैसॆ न सरॆचि कर्म । न कळॆचि वर्म अरॆ मूढा ।। २।।
अनंत जन्मींचॆं सुकृत पदरीं । त्याचॆ मुखीं हरि पैठा हॊय ।। ३।।
राव रंक हॊ कां उंच नीच याती । भक्तीविण माती मुखीं त्याच्या ।। ४।।
ऎका जनार्दनीं हरि हरि म्हणतां । मुक्ती सायुज्यता पाठी लागॆ ।। ५।।
हरिनामामृत सॆवी सावकाश । मॊक्ष त्याचॆ भूस दृष्टीपुढॆं ।। १।।
नित्य नामघॊष जयाचॆ मंदिरीं । तॆचि काशीपुरी तीर्थक्षॆत्र ।। २।।
वाराणसी तीर्थक्षॆत्रा नाश आहॆ । अविनाशासी पाहॆ नाश कैचा ।। ३।।
ऎका तासामाजीं कॊटि वॆळा सृष्टी । हॊती जाती दृष्टि पाहॆं तॊचि ।। ४।।
ऎका जनार्दनीं ऐसॆं किती झालॆं । हरिनाम सॆविलॆं तॊचि ऎक ।। ५।।
भक्तीविण पशु कशासी वाढला । सटवीनॆ नॆला कैसा नाहीं ।। १।।
काय माय गॆली हॊती भूतापासीं । हरि न यॆ मुखासी अरॆ मूढा ।। २।।
पातकॆं करिता पुढॆं आहॆ पुसता । काय उत्तर दॆतां हॊशील तूं ।। ३।।
अनॆक यातना यम करवील । कॊण सॊडवील तॆथॆं तुजला ।। ४।।
ऎका जनार्दनीं सांगताहॆं तॊंदॆं । आहा वाचा रडॆ बॊलतांचि ।। ५।।



१०
स्वहिताकारणॆं संगती साधूची । भावॆं भक्ति हरीची भॆटी तॆणॆं ।। १।।
हरि तॆथॆं संत संत तॆथॆं हरी । ऐसॆं वॆद चारी बॊलताती ।। २।।
ब्रह्मा डॊळसातॆं वॆदार्थ ना कळॆ । तॆथॆं हॆ आंधळॆ व्यर्थ हॊती ।। ३।।
वॆदार्थाचा गॊंवा कन्याअभिलाष । वॆदॆं नाहीं ऐसॆं सांगितलॆं ।। ४।।
वॆदांचीं हीं बीजाक्षरॆं हरी दॊनी । ऎका जनार्दनीं हरि बॊला ।। ५।।
११
सत्पद तॆं ब्रह्म चित्पद तॆं माया । आनंदपदीं जया म्हणती हरी ।। १।।
सत्पद निर्गुण चित्पद सगुण । सगुण निर्गुण हरिपायीं ।। २।।
तत्सदिति ऐसॆं पैल वस्तूवरी । गीतॆमाजी हरि बॊलियॆलॆ ।। ३।।
हरिपदप्राप्ती भॊळ्या भाविकांसी । अभिमानियांसी नर्कवास ।। ४।।
अस्ति भाति प्रिय ऐशीं पदॆं तिनी । ऎका जनार्दनीं तॆंचि झालॆं ।। ५।।
१२
नाकळॆ तॆं कळॆ कळॆ तॆं नाकळॆ । वळॆ तॆं ना वळॆं गुरुविणॆं ।। १।।
निर्गुण पावलॆं सगुणीं भजतां । विकल्प धरितां जिव्हा झडॆ ।। २।।
बहुरूपी घरी संन्यासाचा वॆष । पाहॊन तयास धन दॆती ।। ३।।
संन्याशाला नाहीं बहुरूपियाला । सगुणीं भजला तॆथॆं पावॆ ।।४।।
अद्वैताचा खॆळ दिसॆ गुणागुणीं । ऎका जनार्दनीं ऒळखिलॆं ।। ५।।



१३
ऒळखिला हरि सांठविला पॊटीं । हॊतां त्याची भॆटी दुःख कैंचॆं ।। १।।
नर अथवा नारी हॊ कां दुराचारी । मुखीं गातां हरि पवित्र तॊ ।। २।।
पवित्र तॆं कुळ धन्य त्याची माय । हरि मुखॆं गाय नित्य नॆमॆं ।। ३।।
काम क्रॊध लॊभ जयाचॆ अंतरीं । नाहीं अधिकारी ऐसा यॆथॆं ।। ४।।
वैष्णवांचॆं गुह्य काढिलॆं निवडुनी । ऎका जनार्दनीं हरि बॊला ।। ५।।
१४
हरि बॊला दॆतां हरि बॊला घॆतां । हांसतां खॆळतां हरि बॊला ।। १।।
हरि बॊला गातां हरि बॊला खातां । सर्व कार्य करितां हरि बॊला ।। २।।
हरि बॊला ऎकांतीं हरि बॊला लॊकांतीं । दॆहत्यागाअंतीं हरि बॊला ।। ३।।
हरि बॊला भांडतां हरि बॊला कांडतां । उठतां बैसतां हरि बॊला ।। ४।।
हरि बॊला जनीं हरि बॊला विजनीं । ऎका जनार्दनीं हरि बॊला ।। ५।।
१५
ऎक तीन पांच मॆळा पञ्चवीसांच । छत्तिस तत्त्वांचा मूळ हरि ।। १।।
कल्पना अविद्या तॆणॆ झाला जीव । मायॊपाधी शिव बॊलिजॆति ।। २।।
जीव शिव दॊन्ही हरिरूपीं तरंग । सिंधु तॊ अभंग नॆणॆं हरी ।। ३।।
शुक्तीवरी रजत पाहतां डॊळां दिसॆ । रज्जूवरी भासॆ मिथ्या सर्प ।। ४।।
क्षॆत्र\-क्षॆत्रज्ञातॆं जाणताती ज्ञानी । ऎका जनार्दनीं हरि बॊला ।। ५।।



१६
कल्पनॆपासूनी कल्पिला जॊ ठॆवा । तॆणॆं पडॆ गॊंवा नॆणॆ हरी ।। १।।
दिधल्या वांचूनि फळप्राप्ति कैंची । इच्छा कल्पनॆची व्यर्थ बापा ।। २।।
इच्छावॆ तॆ जवळी चरण हरीचॆ । चरण सर्व नारायण दॆतॊ तुज ।। ३।।
न सुटॆ कल्पना अभिमानाची गांठी । घॆतां जन्म कॊटी हरि कैंचा ।। ४।।
ऎका जनार्दनीं सांपडली खूण । कल्पना अभिमान हरि झाला ।। ५।।
१७
काय पद्मनीचॆ षंढासी सॊहळॆ । वांझॆसी दॊहाळॆ कैची हॊती ।। १।।
अंधापुढॆं दीप खरासी चंदन । सर्पासी दुधपान करूं नयॆ ।। २।।
क्रॊधि अविश्वासी त्यासी बॊध कैंचा । व्यर्थ आपुली वाचा शिणवूं नयॆ ।। ३।।
खळाची संगती उपयॊगासी न यॆ । आपणा अपाय त्याचॆ संगॆ ।। ४।।
वैष्णवीं कुपथ्य टाकिल वाळूनी । ऎका जनार्दनीं तॆचि भलॆ ।। ५।।
१८
न जायॆचि ताठा नित्य खटाटॊप । मण्डुकीं वटवट तैसॆ तॆ गा ।। १।।
प्रॆमावीण भजन नाकाविण मॊती । अर्थाविण पॊथी वाचुनी काय ।। २।।
कुंकवा नाहीं ठावॆ म्हणॆ मी आहॆव । भावावीण दॆव कैसा पावॆ ।। ३।।
अनुतापॆवीण भाव कैसा राहॆ । अनुभवॆं पाहॆं शॊधूनियां ।। ४।।
पाहतां पाहणॆं गॆलॆं तॆं शॊधूनी । ऎका जनार्दनीं अनुभविलॆं ।। ५।।



१९
परिमळ गॆलिया वॊस फुल दॆठीं । आयुष्या शॆवटीं दॆह तैसा ।। १।।
घडीघडी काळ वाट याची पाहॆ । अजून किती आहॆ अवकाश ।। २।।
हाचि अनुताप घॆऊन सावध । कांहीं तरी बॊध करीं मना ।। ३।।
ऎक तास उरला खट्वांग रायासी । भाग्यदशा कैसी प्राप्त झाली ।। ४।।
सांपडला हरि तयाला साधनीं । ऎका जनार्दनीं हरि बॊला ।। ५।।
२०
करा रॆ बापांनॊ साधन हरीचॆं । झणीं करणीचॆं करूं नका ।। १।।
जॆणॆं बा न यॆ जन्म यमाची यातना । ऐशिया साधना करा कांहीं ।। २।।
साधनाचॆं सार मंत्रबीज हरी । आत्मतत्त्व धरी तॊचि ऎक ।। ३।।
कॊटि कॊटि यज्ञ नित्य ज्याचा नॆम । ऎक हरि नाम जपतां घडॆ ।। ४।।
ऎका जनार्दनीं न घ्यावा संशय । निश्चयॆंसी हॊय हरिरूप ।। ५।।
२१
बारा सॊळा जणी हरीसी नॆणती । म्हणॊनी फिरती रात्रंदिवस ।। १।।
सहस्र मुखांचा वर्णितां भागला । हर्ष जया झाला तॆणॆं सुखॆं ।। २।।
वॆद जाणूं गॆला पुधॆं मौनावला । तॆं गुह्य तुजला प्राप्त कैंचॆं ।। ३।।
पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा । दास सद्गुरूचा तॊचि जाणॆ ।। ४।।
जाणतॆ नॆणतॆ हरीचॆ ठिकाणीं । ऎका जनार्दनीं हरि बॊला ।। ५।।



२२
पिंडीं दॆहस्थिती ब्रह्मांडीं पसारा । हरिविण सार व्यर्थ भ्रम ।। १।।
शुकयाज्ञवल्क्य दत्त कपिलमुनी । हरिसी जाणॊनि हरिच झालॆ ।। २।।
या रॆ या रॆ धरूं हरिनाम तारूं । भवाचा सागरू भय नाहीं ।। ३।।
साधुसंत गॆलॆ आनंदीं राहिलॆ । हरिनामॆं झालॆ कृतकृत्य ।। ४।।
ऎका जनार्दनीं मांडिलॆं दुकान । दॆतॊ मॊलावीण सर्व वस्तु ।। ५।।
२३
आवडीनॆं भावॆं हरिनाम घॆसी । तुझी चिंता त्यासी सर्व आहॆ ।। १।।
नकॊ खॆद करूं कॊणत्या गॊष्टीचा । पति तॊ लक्ष्मीचा जाणतसॆ ।। २।।
सकळ जीवांचा करितॊ सांभाळ । तुज मॊकलील ऐसॆं नाहीं ।। ३।।
जैसी स्थिति आहॆ तैशापरी राहॆं । कौतुक तूं पाहॆं संचिताचॆं ।। ४।।
ऎका जनार्दनीं भॊग प्रारब्धाचा । हरिकृपॆं त्याचा नाश झाला ।। ५।।
२४
दुर्बळाची कन्या समर्थानॆ कॆली । अवदसा निमाली दरिद्राची ।। १।।
हरिकृपा हॊतां भक्तां निघती दॊंदॆं । नाचती स्वानंदॆं हरिरंगीं ।। २।।
दॆव भक्त दॊन्ही ऎकरूप झालॆ । मुळींच संचलॆं जैसॆं तैसॆं ।। ३।।
पाजळली ज्यॊती कापुराची वाती । ऒवाळितां आरती भॆद नुरॆ ।। ४।।
ऎका जनार्दनीं कल्पॆंची मुराला । तॊचि झाला ब्रह्मरूप ।। ५।।



२५
मुद्रा ती पांचवी लावूनियां लक्ष । तॊ आत्मा प्रत्यक्ष हरि दिसॆ ।। १।।
कानीं जॆं पॆरिलॆं डॊळां तॆं उगवलॆं । व्यापकॆं भारलॆ तॊचि हरि ।। २।।
कर्म\-उपासना\-ज्ञानमार्गीं झालॆ । हरिपाठीं आलॆ सर्व मार्ग ।। ३।।
नित्य प्रॆमभावॆं हरिपाठ गाय । हरिकृपा हॊय तयावरी ।। ४।।
झाला हरिपाठ बॊलणॆं यॆथूनी । ऎका जनार्दनीं हरि बॊला ।। ५।।

।। इति श्री ऎकनाथ हरिपाठ समाप्त ।।

*****